चिचाळा गावात तीन अस्वलीची भटकंती
एका अस्वलीचा रात्रभर धुमाकूळ
सकाळी जेरबंद,एक गंभीर जखमी,नागपूर येथे भरती
मूल:- प्रादेशिक वनपरिक्षेत्र चिचपल्ली अंतर्गत येणा-या मूल तालुक्यातील चिचाळा येथे मंगळवारच्या रात्री तीन अस्वलींनी गावात भटकंती केली.त्यातील एका अस्वलीने रात्रौभर धुमाकूळ माजविला.त्यात चिचाळा येथील एका घरातील सुरेश काशिनाथ कुनघाडकर ,वय 60 वर्षे हा गंभीर जखमी झाला.याला मूल मध्ये प्राथमिक उपचार करून नागपूर येथे पुढील उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.या घटनेने चिचाळा येथे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.बुधवारी सकाळी वनविभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबवून धुमाकूळ माजविणा-या अस्वलीला जेरबंद करण्यात यश मिळवले.तिला जंगलात सोडण्यात आले.मंगळवारच्या रात्री बारा वाजताच्या दरम्यान चिचाळा वासियांनी अस्वलींचा थरार आपल्या उघडया डोळयांनी बघितला. चिचाळा गाव जंगलाच्या शेजारी असून कवडपेठ मार्गाने तीन अस्वली गावात पोहचल्या. त्यातील दोन अस्वली परत जंगलात निघून गेल्या.त्यातील एक भटकल्याने रात्रभर गावात धुमाकूळ घालीत होती.कुत्र्ो मागे लागल्याने तसेच नागरिकांच्या ओरडण्याने पिसाळलेल्या एका अस्वलीने जिथे मार्ग मिळेल तिथे आपले बस्थान मांडण्याचा प्रयत्न केला.एका घरा शेजारी आल्यानंतर घराच्या बाहेर निघालेल्या सुरेश काशिनाथ कुनघाडकर,वय 60 वर्षे याला गंभीर जखमी केले.त्याच्या डोळयाजवळ गंभीर इजा झाल्याने त्यास मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार करून चंद्रपूर येथे रेफर केले.परंतु,गंभीर जखमी झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहे.त्याच्या कुटुंबीयांना तातडीची दहा हजाराची आर्थीक मदत वनविभागाने केली आहे. एका अस्वलीच्या देखरेखी साठी वनविभागाची चमू येथे तैनात करण्यात आली.बुधवारी सकाळी रेस्क्यू ऑपरेशन राबवून अस्वलीस जेरबंद करण्यात यश मिळाले.तिला जंगलात सोडण्यात आल्याचे एका वन कर्मचा-याने सांगितले.अस्वलीच्या थरारामुळे चिचाळा येथे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे पुन्हा एकदा मानव वन्यजीव संघर्ष निर्माण झाला आहे.




