संपादकीय
========
रेल्वे मालधक्क्याचा अट्टहास का ?
मूल मध्ये रेल्वे मालधक्का होणार असल्याच्या बातमीने जनक्षोभ पेटला आहे. जनभावना तीव्र झाली आहे.त्यासाठी मालधक्का हटाव संघर्ष समिती स्थापन झाली आहे. मात्र,एका छुप्या गटातून मूल मध्येच रेल्वे मालधक्का झाला पाहिजे,त्यासाठी सहयांची मोहिम राबवली जात असल्याचे चित्र मूल मध्ये आहे. खळबळ माजविणारे एक निवेदन सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल होत आहे. मूल मध्येच रेल्वे मालधक्का व्हावा , ऐवढा अट्टहास या लोकांचा का असावा ? असा सवाल जनतेच्या मनात आहे. लोकांच्या भावनांशी खेळून मालधक्का तुम्हाला ‘अर्थ‘पूर्ण करणार आहे का?हा गंभीर प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. रेल्वे मालधक्का नेमका कुणाला हवाय ? असा सर्व्हे मूल मध्ये केला का ? ग्रामसभा भरवली का ? जनतेचा आवाज लक्षात घेतला जात आहे का ? तर,या प्रश्नांची उत्तरे ‘ नाही ‘ असा आहे.
एकंदरीत जनतेच्या मनात काय आहे,हे विचारत न घेता सरळ सरळ मुख्यमंत्र्यांचे नावाने निवेदन तयार करून त्यावर लोकांच्या सहया घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला ? हा प्रश्न ठासून जनता विचारत आहे. वाघ,जंगल, रोजगार आणि मालधक्का असे समिकरण निवेदनात स्पष्ट दिसत आहे.ही शुदध फसवणूक आहे.पण,जनता शिक्षित आहे.समजदार आहे.विचारपूर्वक निर्णय घेणारी आहे.आपली क्षमता ओळखणारी आहे.काय हवे,काय नको यावर विचार मंथन करणारी आहे.त्यामुळे छुप्या गटाचे निवेदन धुडकावून लावतील यात तीळमात्र शंका नाही.
सुरजागड येथून येणारा खनिज साठा लोकांच्या जीवनमानावर विपरीत परिणाम करणारा ठरेल.असा अनुभव लोकांना आहे.तशी परिस्थिती गडचिरोली जिल्हयात लोकं अनुभवत आहे.लोकांच्या शारीरिक,मानसिक,बौदधीक घटकांवर त्याचा गंभीर परिणाम होण्याची भिती जनमानसात आहे.खनिज साठा वाहून नेणारे जड वाहतूक वाढतील.धुळीचे साम्राज्य निर्माण होतील.रस्त्यांची अवस्था बिकट होतील.अपघाताचे प्रमाण वाढतील.शाळकरी विदयार्थ्यांचे जीव धोक्यात येतील.एकमेव क्रीडांगणाचे अस्तित्व मिटेल.मूलवासींच्या आरोग्यावर गंभीर परिणाम दिसू लागतील. एकंदरीत जल प्रदुषण,वायू प्रदूषण, ध्वनी प्रदुषण आणि मृदा प्रदुषणात भर पडेल. अशांततेचे वातावरण निर्माण होतील.व्यसनाधिनता वाढेल. खनिज साठा वाहतुकी दरम्यान त्यातून उडणा-या धुळींमुळे पीकांवर परिणाम होतील.पीके खराब होतील.निकृष्ट शेतमालाला भाव मिळणार नाही.बळीराजा कर्जाच्या ओझ्याखाली जगेल. तसेच सर्वत्र रोगराईचे साम्राज्य निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. याचा कोणी विचार केला ?
या सर्व घटकांसाठी जबाबदार कोणाला पकडणार ? शासनाला,प्रशासनाला,कंपनीला की,वरदहस्त दुतांना ? आज मूल शहर शुदध आहे.वातावरण चांगले आहे.शांत आहे. लोकांना आवडत असल्याने निवासी राहत आहेत.त्यांना सुखाने राहू दया.सुख पदरात पाडून घेण्यासाठी त्यांचे आपआपल्या परिने श्रम,परिश्रम,कष्ट सुरू आहेत.दोन वेळची कष्टाची भाजी भाकरी त्यांची सुरूळीत सुरू आहे.ते तसेच सुरूळीत सुरू राहण्यासाठी असेच सुंदर वातावरण निर्मिती आवश्यक आहे. प्रश्न आहे तो ,रोजगाराचा.रोजगार भरपूर आहे.काम करणा-याला रोजगाराची कमी नाही.तांदळाच्या व्यवसायासाठी मूल प्रसिदध आहे.धानाचे कोठार आहे.येथे राईस मील भरपूर असल्याने आपोआप रोजगार निर्माण झाले आहे.अनेक पदांवर काम करण्यासाठी तज्ज्ञांची,शिक्षित वर्गांची,बेरोजगारांची आवश्यकता येथे आहे. आकापूर येथे एमआयडीसी आहे.येथेही प्रदुषण विरहीत रोजगाराची निर्मिती केल्या जावू शकते. पंरतु,मुठभर….. याकडे लक्ष देणार नाहीत. लोकांना ‘ धक्का ‘ मारून ‘ माल ‘ आपल्या खिश्यात कसा भरता येईल ? याकडे वाढणारा त्यांचा कल ‘ विनाश काली विपरीत बुदधी ‘ चा परिचय करून देणारा ठरतो. वाघ आणि मानव- वन्यजीव संघर्ष हा न संपणारा विषय आहे.तो उदयाही तसाच राहणार आहे. मूल शहराच्या सर्वांगिण विकासासाठी – स्वच्छ,सुंदर संकल्पनेसाठी रेल्वे मालधक्का हटाव,मूल शहर बचाव ही मोहीम समर्थनीय आहे. संघर्ष समितीने निर्माणाधिन रेल्वे मालधक्का मूल मध्ये होवू नये यासाठी नगर पालिकेने ठराव घ्यावा यासाठी निवेदन दिले आहे. परिसर नगर पालिकेच्या हददीतील आहे.त्यामुळे आता नगर पालिकेची भूमिका महत्वाची ठरणार आहे.नगर पालिका जनतेचा आवाज नक्कीच ऐकणार ? यात कोणतीही शंका नाही.
श्री.विनायक रेकलवार
मुख्य संपादक
जनतेचा आवाज
8975140998




