वाघाच्या हल्ल्यात सोमनाथ प्रकल्पातील कुष्ठरोगी महिला ठार

285
वाघाच्या हल्ल्यात सोमनाथ प्रकल्पातील कुष्ठरोगी महिला ठार
वसाहती मध्ये खळबळ,सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी
प्रकल्पातील दुसरी घटना
मूल:- घरातील खरकटे भांडे बाहेर घासण्यासाठी आणलेल्या एका कुष्ठरोगी महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले.ही घटना सोमवारी पहाटे 4.30 वाजताच्या दरम्यान सोमनाथ प्रकल्पातील आमटे फॉर्म येथे घडली.सोमनाथ प्रकल्पातील ही दुसरी घटना आहे.या घटनेने प्रकल्पातील कुष्ठरोगी वसाहतीतील रहिवास्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. मृतक महिलेचे नाव अन्नपूर्णा तुळशीराम बिलाने असे आहे. प्रकल्पामध्ये प्रशासन,वनविभाग आणि शासनाने सोयी सुविधा उपलब्ध करून दयावे अशी मागणी होत आहे. सोमनाथ प्रकल्पातील कुष्ठरोगी वसाहतीमध्ये 350 कुटुबांचा वास्तव्य आहे.नेहमी प्रमाणे अन्नपूर्णा तुळशीराम बिलाने वय 60 वर्षे या पहाटे उठल्या.काही वेळेनंतर भांडे घासण्यासाठी खरकटे भांडे घराच्या मागच्या बाजूने आणायला सुरूवात केली.हा भाग जंगलाला लागून असल्याने येथे दबा धरून बसलेल्या वाघाने अन्नपूर्णा बिलाने यांच्यावर झडप घालून त्यांना काही अंतरावर फरफटत नेेले.आरडाओरड झाल्याने पती तुळशीराम हा धावत आला. तुळशीराम अन्नपूर्णाचे पाय धरून वाघाच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला. वसाहतीतील नागरिक गोळा झाल्याने वाघाने अन्नपूर्णाला आपल्या तावडीतून सोडून जंगलात पसार झाला.तो पर्यंत अन्नपूर्णाचा जागीच मृत्यू झालेला होता. प्रकल्पाचे समन्वयक अरूण कदम यांनी या घटनेची माहिती तात्काळ वनविभागला दिली.वनविभागाने घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात पाठविले. वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची ही प्रकल्पातील दुसरी घटना आहे.पहिली घटना आठ जून रोजी प्रकल्पातील कुष्ठरोगी ठार झालेला होता.परत आठ सप्टेंबर रोजी एक महिला ठार झाल्याने प्रकल्पात खळबळ उडाली आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाने सोमनाथ प्रकल्पातील कुष्ठरोगी वसाहतीमध्ये सोयी सुविधा उपलब्ध करून दयाव्यात अशी मागणी जोर पकडत आहे.


वाघाच्या जबडयात मुंडके आणि पाय पतीच्या हातात —
अन्नपूर्णाला वाघाने जबडयात पकडल्यानंतर आरडाओरड झाली. फरफटत नेले.पती तुळशीराम हा आपल्या अन्नपूर्णाला सोडविण्यासाठी धावला.तिचे पाय पकडून सोडविण्याचा प्रयत्न केला.परंतु मंुडके वाघाच्या जबडयात असल्याने त्याचे प्रयत्न निष्फळ ठरले.वाघाने अन्नपूर्णाला सोडून जंगलात पोबारा केला.तोपर्यंत अन्नपूर्णा गतप्राण झाली होती.

सोयी सुविधा करण्याची मागणी केली होती —
आठ जून रोजी प्रकल्पातील रहिवासी कुष्ठरूग्ण ,कार्यकर्ता जयदेव करनकर याच्या वर  वाघाने हल्ला करून ठार केले होते.त्यानंतर तब्बल तीन महिण्यानंतर सोमनाथ प्रकल्पामध्ये झालेला हा दुसरा हल्ला आहे. सोमनाथ प्रकल्पाचा परिसर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात येतो.येथे कुष्ठरोगी,अंध,दिव्यांग,निराधार वृध्दांचे निवासस्थान आहेत.या परिसरात वाघ,बिबट,अस्वल,रानकुत्रे तसेच इतर वन्यप्राण्यांचा मोठा संचार आहे.सोमनाथ प्रकल्पाच्या आमटे फॉर्म वसाहतीतील रहिवाश्यांनी वन विभागाकडे तारेचे कुंपण,ए आय कॅमेरे आणि अन्य उपाययोजना,सोयी सुविधा पुरविण्याची मागणी केली होती.वनविभाग आणि जिल्हा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ही दुसरी घटना घडली असा आरोप होत आहे. प्रकल्पात 350 कुटुंबांचे वास्तव्य आहे.तरीही प्रशासन कामचुकार पणा का दाखवित आहे,असा प्रश्न या निमित्ताने येथे चर्चिल्या जात आहे.

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष:- प्रसिदध समाजसेवक, रॅमन मॅगसेसे पुरस्कार,पदमश्री,पद्मविभूषण,ज्यांनी कुष्ठरोग्यांच्या सुश्रूषेसाठी अख्ख आयुष्य खर्ची घातल असे महाराष्ट्र भूषण बाबा आमटे यांनी 1968 मध्ये सोमनाथ येथे आमटे फॉर्म प्रकल्प स्थापन केला.कुष्ठरोग्याना सन्मानाने जगता यावे यासाठी शेती,जलसंवर्धन,युवक शिबिर,आरोग्य शिबिर  पर्यावरण विषयी अनेक उपक्रम राबविले.युवकांना श्रमदानाचे महत्व समजावे यासाठी मे महिण्यात श्रम संस्कार शिबिर आयोजित केल्या जाते. मागिल 55 वर्षांपासून अनेक रोगमुक्त परिवार येथे वास्तव्य करीत आहे.प्रकल्पात केलेल्या कामाचा अभ्यास व शिक्षण घेवून विविध भागातील विदयार्थी,विदेशी पाहूणेे यांची सतत येथे ये जा असते.प्रकल्पात जिल्हा परिषद शाळा,पोष्ट ऑफिस इत्यादी सविधा आहे.मारोडा ग्रामपंचायत अंतर्गत सोमनाथ प्रकल्प समाविष्ठ आहे. वन्यप्राण्याच्या दहशतीमध्ये येथील परिवार असताना साधे लोकप्रतिनिधींनी येथे भेट देवून विचारपूस करू नये अशी खंत व्यक्त होत आहे. प्रकल्पातील रहिवाश्यांसाठी स्मशान भूमी सुदधा नाही.उघडयावर अंत्यसंस्कार पार पाडावे लागतात,कुष्ठरोगी म्हणून त्यांच्या नशिबी मरणानंतर सुदधा वेदनाच असल्याचे येथिल समन्वयक अरूण कदम म्हणतात.